सोमवार, २ जून, २०१४

१. सोनेरी लाटांची गोष्ट : भाग चार

                                 
                                       'विरार सार्वजनिक वाचनालय व  ग्रंथालय' असं एका पाटीवर लिहिलं होतं. त्या पाटी खालीच एक दरवाजा होता. तो उघडाच होता. त्या दरवाजाच्या आत कुणीतरी येडपटासारखा भरपूर अंधार करून ठेवला होता. एका टेबलाच्या पाठी एक चश्मिष काका आणि चाश्मिष काकी एकदम गप्प बसले होते. त्यांच्यापुढयात टेबलावर कितीतरी रंगीबेरंगी चित्रांची पुस्तकं, आमच्या वर्गातल्या हजेरीपटासारख्या मोठ्ठाल्या जाडजूड वह्या, पेनं, स्केचपेनं, गमाची निळी डबी, शाईचा पॅड आणि कसले कसले शाईने माखलेले गोल, चौकोनी, आयताकृती शिक्के पडलेले होते. मला त्या टेबलाजवळ थांबायला सांगून पप्पा एका कपाटाजवळ गेले. त्या काचा लावलेल्या कपाटात खूप सारी पुस्तकं कुणीतरी एकदम रांगेतच लावून ठेवली होती. हे त्या गप्प बसून राहिलेल्या चश्मिष  काका-काकींचच काम असणार. मी पाठीमागे वळून त्यांच्याकडे पाहायला गेलो आणि एकदम भ्यायलोच!

ते दोघं सरळ सरळ माझ्याकडेच पाहत होते!!

आणि ते अजुनी हसत नव्हते!!!

त्या काकांनी तर त्यांच्या भुवयाच उडवायला सुरुवात केली.
                                   
                                      काय रे पोरा? नाव काय तुझं? इथे काय करतोयस? असा का पाहतोयस? ठेऊ का तुला  कपाटात नेउन? प्रत्येक वेळी भुवई उडवताना ते काका असलंच कायतरी विचारत असणार, असं वाटून माझ्या पोटात जोरात दुखू लागलं. म्हणून मग मी हाताची घडी घालून त्या मॅडकॅप काका-काकींकडे न बघता पुस्तकांच्या कपाटांकडे बघू लागलो. एक, दोन, तीन, चार. एका रांगेत चार आणि एकूण रांगा पाच, म्हणजे चार पंचे वीस. पुन्हा त्या काका-काकींच्या पाठीमागे एक-एक. एकूण बावीस कपाटं! बाप्पा!

"अय्या तू SSS"
                                     मी गर्रकन मान वळवून दरवाजापाशी पाहिलं. एक सफेद केस, सफेद मिशा आणि सफेदच कपडे घातलेले हसरे आजोबा उभे होते. पण त्यांनी मला लहान मुलीसारखा आवाज काढून का हाक मारली?

मी त्यांच्याकडे नीटच पाहिलं. त्यांच्या एका हातात पुस्तक होतं आणि दुसरया हातात एका मुलीचा हात. ती मुलगी माझ्या एवढीच होती आणि तिने फिक्कट निळ्या रंगाचा फ्रॉक घातला होता. तिचे डोळे मोठे गोल-गोल होते आणि ती माझ्याकडेच हसत पाहत होती.
प्रांजली!

"आजुबाबा हा नं अक्षय. हा किनई आमच्याच वर्गात आहे. आणि तुम्हाला सांगू, याला किनई आपली सोनेरी लाटांची गम्मत पहायची आहे. तो किनई…. "
                                     मी त्या आजोबांना नमस्कार केला. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेऊन केस विस्कटल्यासारखं केलं. मला मस्तच वाटलं ते. तेवढ्यात कपाटाच्या जंगलात हरवलेले पप्पा एक पुस्तक घेऊन हसत हसत आमच्याजवळ आले. त्यांनी ते पुस्तक आणि खिशातलं एक कार्ड त्या टेबलामागच्या काकांकडे दिलं. ते काका त्यांच्या वहीत काहीतरी लिहू लागले. तोपर्यंत मी प्रांजलीला आणि तिच्या आजुबाबांना, 'हे माझे पप्पा', असं सांगितलं. पप्पांनी त्यांना नमस्कार केला आणि  मग ते त्या आजुबाबांच्या हातातल्या पुस्तकाविषयी काहीतरी बोलू लागले. तोवर प्रांजली आणि मी दरवाजाबाहेर येउन बोलू लागलो. प्रांजलीची गाडी एकदम जोरातच चालू झाली. सोमवारच्या गृहपाठाबद्दल, बाईंनी घरून काढून आणायला सांगितलेल्या प्राण्यांच्या चित्राबद्दल, शनिवारी घरी जाताना रस्त्यात पाय घसरून पडलेल्या गौरीबद्दल, काय काय नि काय काय. पण मधेच तिच्या गाडीला ब्रेक लागला. पप्पा आणि तिचे आजोबा आमच्याजवळ आले.
"आजुबाबा किती उशीर? चला नं लवकर तळ्याजवळ आणि तुम्ही पण चला ना काका, तिथे तळ्याजवळ किनई आमची एक गम्मतच आहे सोनेरी लाटांची."
                                      प्रांजली कुणासमोर बोलायला घाबरतच नाही. नाहीतर आम्ही. आम्हाला लवकर असं कुणाशी बोलायला जमतच नाही.

"सोनेरी लाटांची गम्मत? अरे वा! मग आम्हाला पण पाहिलीच पाहिजे ती एकदा. चला  दाखवा पाहू. आम्ही पण येतो तुमच्यासोबत."
                                      पप्पा प्रांजलीशी बोलताना मला ते एकदम आमच्या वर्गातले असल्यासारखेच  वाटले. मी हळूच पप्पांचा हात हातात घेऊन दाबल्यासारखं केलं. खरं तर मला त्यांच्या गळ्यातच हात टाकण्यासारखं वाटत होतं. म्हणजे आम्ही मित्र-मित्र एकमेकांच्या गळ्यात हात टाकतो ना, तस्सं. पण ते जमणार थोडीच. पप्पा माझ्याकडे पाहून हसत होते. प्रांजली आणि तिचे ते धिप्पाड मिशीवाले आजुबाबाही हसत होते. त्या सगळ्यांना पाहून मी पण हसत होतो. आमच्या बाजूची नगरपालिकेची इमारत, वाचनालयाची ती बुद्धू पाटी, डांबरी रस्ता, त्यावरची अशोकाची झाडं, आजूबाजूची माणसं, वरचं गुलाबी आभाळ, आभाळातले ढग सगळेच हसत होते.

फक्त आतली दोन माणसं सोडून. मॅड कॅप.

                                      आम्ही चालू लागलो. पप्पा आणि प्रांजलीचे आजुबाबा एकत्र चालत होते नि त्यांच्या पुढे प्रांजली आणि मी त्यांच्यासारखेच एकत्र चालत होतो. म्हणजे फक्त मी चालत  होतो. पण प्रांजली? ती चालता-चालता मधेच उडी मारल्यासारखं करत होती. तिचं पाहून मग मी पण लगेच तश्शीच उडी मारायचो. प्रांजलीची गाडी अजुनी चालूच होती. ती मला तिच्या नि आजुबाबांच्या गमती जमती सांगत होती. सांगत होती म्हणजे एकटीच बडबडत  होती. मी मधूनच हू, अरे वा! मज्जाच कि मग! बापरे!! असलं कायतरी बोलत होतो. माझं काय तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. प्रांजलीच्या त्या फिक्कट निळ्या रंगाच्या फ्रॉक वर कुठे कुठे छोटी कापडी सफेद फुलं लावलेली होती. प्रांजली उडया मारत चालताना ती फुलं मस्तपैकी वरखाली हलतडुलत होती. मी त्यांच्याकडेच पाहत चाललो होतो.
                                     चालत-चालत आम्ही रस्त्याच्या कडेला खाली आलो. तिथे खाली छानपैकी छोटं छोटं गावात उगवलेलं होतं. सभोवताली भरपूर नारळाची झाडं होती. मी वर पाहिलं. वरती नारळाच्या झाडांच्या झावळ्याच झावळ्या वाऱ्यानं हलताना दिसत होत्या. त्या झावळ्यांचं एक मस्तपैकी छप्परच वरती तयार झालं होतं. झाडांच्या पुढे लांबच लांब आडव्या दगडी पायरया होत्या. आम्ही त्या पायरयांजवळ गेलो. एकूण चार पायरया दिसत होत्या. पाचवी पायरी तलावाच्या पाण्याखाली दिसत होती. पण तिच्याही खाली आणखीन बरयाच पायरया आहेत, असं प्रांजली म्हणाली. पप्पा आणि आजुबाबा पायरयांजवळ येउन उभे राहिले. ते अजुनी बोलतच होते. मी त्यांच्याकडे पाहत असतानाच प्रांजलीने पटकन माझा हात खेचून मला खाली बसवलं. आम्ही दोघं दुसरया पायरीवर बसलो होतो.
"आता गुपचूप समोर बघत बसायचं."
                                     असं बोलून प्रांजली खरोखरीच गप्प बसून समोर पाहू लागली. मघापासून सुरु असलेली तिची गाडी अशी अचानक बंदच पडल्याने मला सगळं खूपच शांत शांत वाटू लागलं. मी वरती पाहिलं. ते नारळाच्या झाडांचं छप्पर इथेही थोडं बाहेर आल्यासारखं होतं. खाली तलावाच्या पाण्यात पाहिलं तर मला ते छप्पर, त्याखाली गप्प समोर बघत बसलेली प्रांजली आणि येडपटासारखं स्वतः कडे पाहणारा मी दिसलो. मी माझ्या भुवया उडवून पाहिल्या. केस विस्कटलेले ते जरा नीट केले. तेवढयात तलावाच्या पाण्यावर कसलासा प्रकाश पडल्यासारखं झालं. मी समोर पाहिलं आणि पाहतच राहिलो.


                                      समोर आकाशात थोडे वरती-थोडे खालती असे लालेलाल झालेले सूर्यमहाराज होते. त्यांची तांबूस नारंगी किरणं पडून तळ्याचं पाणीसुद्धा लालेलाल सोनेरी दिसत होतं. कुठूनतरी थोडासा वारा वाहत होता आणि त्या वारयामुळे तलावाच्या पाण्यावर छोट्या छोट्या लाटा उमटल्या होत्या. त्या लाटांवर तलावाचं सोनेरी पाणी हलत होतं.

सोनेरी लाटा!

                                     मी डोळे विस्फारून कि काय म्हणतात, तसं ते गप्प पाहत होतो. पप्पा आणि प्रांजलीच्या आजुबाबांचाही आता आवाज येत नव्हता. मी हळूच मान वळवून त्यांच्याकडे पाहिलं तर तेसुद्धा शांतपणे त्याच सोनेरी लाटा पाहत होते.

मी पुन्हा मान सरळ करून त्या लाटांकडे पाहू लागलो. माझ्या हातावर एक चापटीच पडली. मी प्रांजलीकडे पाहिलं तर ती खोडकरपणे हसत माझ्याकडेच पाहत होती. मग मीसुद्धा तिच्या हातावर एक चापटी मारून फिट्टमफाट केलं. आम्ही दोघं पण हसत होतो. आता आमच्या सभोवती फक्त सोनेरी लाटाच आहेत आणि त्यांच्यामध्ये फक्त नि फक्त आम्ही दोघच मॅडसारखे हसत बसलो आहोत असंच वाटत होतं मला .











                                           ________*** समाप्त ***________

कशी वाटली गोष्ट?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा