शुक्रवार, ४ जुलै, २०१४

२. खजिना : भाग दोन

                                      एका वर्षामध्ये असतात बारा महिने. एकूण दिवस तीनशेसाठ. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा.. पुन्हा तेच चक्र सुरु. अण्णा कधीच घराच्या बाहेर जात नाहीत. फक्त माझघरातली कॉट आणि पडवीतली खुर्ची. एकदा मी त्यांच्या त्या लाकडी खुर्चीत बसून पाहिलं. तिथून आमचं घराबाजूचं शेत, शेतातलं नारळाचं झाड, त्यापुढे आडवा गेलेला डांबरी रस्ता आणि रस्त्याच्या पलीकडची घरं, असलं सगळं छानच दिसत होतं. पण किती वेळ? मला कंटाळा यायला वेळ लागलाच नाही. पण मग अण्णांना कंटाळा येत असणार कि नाही? रस्त्यावरून अण्णांएवढे किंवा त्यांच्यापेक्षाही म्हातारे आजोबा लोक इकडे-तिकडे जात असतात, त्यांच्याकडे पाहून अण्णांना कसं वाटत असणार? कुल्याप्पा, विन्या, अभी असले माझे मित्र आले की आमच्या अंगणात आम्ही खूप खेळ खेळतो. दुपारच्या वेळी बाहेर पाहिलं तर गायी-बैलं ढिम्मपणे इकडे-तिकडे फिरत असतात. संध्याकाळच्या वेळी सूर्याची शेंदरी किरणं अंगणात येतात. नारळाच्या झाडावर कुठूनतरी दोन कणेर पक्षी रोज येउन बसतात. छानसा वारासुद्धा अंगणात एकटाच खेळत असल्यासारखा वाटतो. हे सगळं पाहून काहीच बोलावसं वाटणार नाही असं होणार थोडीच!

                                      मला पक्कं माहित आहे अण्णा सगळ्यांशी- आमच्याशी, त्या गायी-बैलांशी पक्षांशी सूर्याशी झाडांशी वाऱ्याशीसुद्धा भरपूर बोलत असणार पण मनातल्या मनात. त्यांच्या मनात सगळ्या गोष्टी-बिष्टींचा मोठ्ठाला खजिनाच तयार झालेला असणार. पण अण्णा म्हणजे त्या खजिन्याची गुहा असलेल्या डोंगरासारखे. सगळा खजिना आत असला तरी बाहेरून एकदम गप्प. पक्के नंबर एक.

                                      आमच्या वाडीतलं मारुतीदादाचं दुकान काही एक नंबर नाही. म्हणजे ते आहे चांगलं. त्यातले चिक्की, बर्फी, आलेपाक, लॉलीपॉप, नल्ली, शेंगदाणे, वाटाणे-चणे, तिखट भडंग वगैरे असलं सगळं कुल्याप्पा म्हणतो तसं "एक लंबर" असतं. पुन्हा सुनील शेट्टीवाली बॉडी असलेला मारुतीदादा आणि दुकानात असताना नेहमी कायतरी खात असणारी नि पटापटा बोलणारी मारुतीदादाची बायको हे पण चांगलेच. मारुतीदादाच्या बायकोला सगळे 'मारुतीदादाची बायको' असंच म्हणणार. लाडातच!
                                      तर असल्या त्या आमच्या वाडीतल्या एकच्या एकच असणारया दुकानात एक चांगली आणि महत्वाची गोष्ट नाहीच. फ्रीज.
                                      त्यामुळे आमच्या एवढ्या जगातल्या सर्वच पोरा-पोरींसाठी अत्यंत आवडीची आणि जीव की प्राण असणारी गोष्ट दुकानात नाही, ती म्हणजे कांडीपेप्सी.
                                     कांडीपेप्सी जर पाहिजे असेल तर मात्र आपल्याला सिंदबाद सारखी एक सफरच करावी लागणार. ती पण सिंदबाद पेक्षाहि साहसयुक्त.

                                      आमच्या वाडीतून पुढे गेलेल्या डांबरी रस्त्याने चालत पुढे निघालं तर मोठ्ठ्या पिंपळाच्या उतारानंतर येतं होळीचं शेत. तिथून एक मोठं वळण घेत घेत पुढे रस्ता जाणार काळ्या आंब्यापाशी. त्याच्यापुढे बामणाचं घर, त्यापुढे पुन्हा उतार मग बालवाडीच्या पुढे पिठाच्या गिरणीपाशी रस्ता वर चढू लागला की त्याच्या टोकावरच बाजूला आहे ते म्हणजे गुरावांचं दुकान. कांडीपेप्सीच्या खजिन्याचं दुकान.
                                     पण हे सगळं पार करून जायचं म्हणजे खायचं काम नाही काही! एकट्याने जायचं तर नावंच नको. दोन भिडू तरी पाहिजेत. पुन्हा चप्पल 'कंपनसरी'.  नाहीतर उन्हाने डांबर इतकं तापलेलं असतं की पाय भाजणारच. एकदम खरपूस. पुढच्या वळणापर्यंत जायला तसं काही नाही. पण वळण संपल्यावरच समोर असणार 'काळा आंबा'. खतरनाक भुतांच्या बापांचा अड्डा!!
                                      तो आंबा यायच्या आधीच त्याच्याकडे न बघता पळत सुटायचं ते डायरेक बामणांचं  घर यायच्या आधी स्टॉप. एकदम स्टॉप. कारण बामणांच्या त्या कंपावणात असणार तीन-तीन कुत्रेसाहेब.  पिक्चरमध्ये बोलतात तसं खूनखार की काय तसले. ते कुत्रे जर कंपावाणाच्या आत असले तर ठीक.  रस्त्यावरनं चूपचाप न पळता पुढे चालत गेलं की काम झालं. पण जर का ते तीन तिघाडे रस्त्यावरच झोपलेले असतील तर मात्र 'सावधान! पुढे धोका आहे'. पेप्सी-बिप्सी विसरून गप उलट फिरायचं आणि त्या साहेब लोकांच्या घशातून अर्रररफफ अर्रररफफ असा आवाज यायच्या आधीच छुमंतर व्हायचं.

                                      एवढे तीन-तीन कुत्रे त्या घरातल्यांनी ठेवलेच कशाला? असं विचारलं कि आज्जी सांगणार, "बामनांच्या घरात रानारे दोघेच. बामन म्हतारा आनी म्हातारी बामनीन. त्यांचं प्वार-बीर सगलं मुम्बैलाच. बामनाचा वाडा म्हंजे लय जुना. त्यात बामनाच्या पनज्यानं माजघराखाली ठेवलाय सोन्याच्या म्होरांचा हंडा. त्या हंड्याव लक्ष ठेवनाऱ्या चोरांची झाली भुतं. ती सगली जमली काल्या आंब्याव आनि लागली बामनाला तरास देयाला. त्येव्वा बामनाने टेटवलीच्या शंकराच्या देवलातल्या पुजारयापासना त्याच्या कुत्रीची तीन पिल्ला आनली. तीच हि तिघव कुत्री. पन त्यांना भ्यायचं नाही.  कुत्रं  म्हनजे दत्तगुरुचं वाहन. त्यांच्या डोल्यातून  दत्तगुरुच आपल्याला पाहत असतात. म्हनून रोज सांजावतीला अंघोली करून शुभं करोति म्हनावी, दत्ताची आरती करावी. मग काय ती कुत्री आपल्याला तरास देयाची नाहीत."
                                      आरती केली की म्हणे कुत्रे भुंकणार नाहीत! कायपण. आज्जी असलं बोलणार नि आम्ही ऐकणार? नावच सोडा.
                                      असलं ते बामणांचं घर. पण ते एकदा ओलांडलं की पुढे काळजीचं काम नाही. सरळ गुरवांचं दुकान. गुरवकाकांनी त्यांचा फ्रीज उघडला की त्यात ऑरेंज, पायनेप्पल, मँगो, जलजीरा, लेमन सगळेच फ्लेवर असणार. त्यांनी पेप्सी आपल्यासमोर धरल्या की त्या पाहूनच आपले डोळे थंड पडणार. मग तो मौल्यवान खजिना घेऊन परत घरी येताना खिशापेक्षा छातीच जास्त भरल्यासारखी वाटते अशा वेळी. कसल्याशा थंडगार ओझ्याने. तुडूंब.




                                                                                               
   
                                                                                             उर्वरित गोष्ट पुढील भागात … 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा