शुक्रवार, १ ऑगस्ट, २०१४

२. खजिना : भाग चार

                                      आम्ही सगळे दुकानापाशी जाउन थांबलो. नानी आणि नंदी आत्या दुकानातल्या मारुती दादाच्या बायकोसोबत बोलू लागल्या. नाना मला एष्टी कुठे-कुठे आणि किती-किती वेळ थांबणार ते सगळं सांगत होता. हळु-हळु  आमच्या भोवताली बरीच गर्दी जमायला लागली. पिकचर मध्ये हिरो-हिरोईनला गुंड लोक घेरतात तसं घेरूनच टाकलं आम्हाला सगळ्यांनी! पण ते गुंड-बिंड नव्हते, त्यामुळे मला बरं वाटलं. एवढ्या सगळ्या बायका, म्हातारया आज्ज्या, पोरं-पोरी कशाला आले विचारायचं कामच नाही. आज्जीनेच त्यांना रस्त्याने चालत दुकानापाशी येताना हाका मारमारून बोलावलं असणार. अगदी नक्कीच! कारण ते सगळे माझ्याकडेच टक लावून पाहात होते. त्यातल्या कुणीतरी बायका येउन माझ्या डोक्यावरून, गालावरून हात फिरवत होत्या. आणखी कुणी "आत्ता पुन्ना कंदी रं येशील बावा? तुझ्या मम्मी-पप्पासला घेऊन ये", असलं कायतरी बोलत होत्या. मला काय बोलायचंच नव्हतं. कारण बोलायचं काम आमच्या आज्जीने जोरातच चालवलं होतं.
                                      अचानक दुरून एष्टीचा 'घ्यँग ग्यँग' आवाज ऐकायला येऊ लागला. मी रस्त्यावर नीटच पाहू लागलो. थोड्याच वेळात कुल्याप्पा, विन्या आणि बाकीच्या पोरांची गँग आपापला गाडा हाकत धावत येताना मला दिसली. त्यांच्या पाठोपाठ रस्त्याला लागून असलेल्या आब्याच्या घरामागून एक लाल-पिवळी एष्टी ऐटीत वळण घेऊन समोरच्या सरळ रस्त्यावर आली आणि पाहता-पाहता आमच्याजवळ येउन दम टाकत उभी राहिलीसुद्धा! तिच्या मोठ्ठाल्या काचेपाठी 'उन्हवरे - मुंबई' अशी पाटी थरथरत होती. दरवाजा उघडून नंदीआत्या आणि मी आत चढलो. आमची शीट शोधून नानाने आमचं सामान लावून दिलं आणि लगेच तो खाली उतरला. झटकन कंडक्टर काकांनी बेल वाजवली आणि पटकन कुणीतरी धक्का दिल्यासारखं करून एष्टी चालू झाली. त्या सगळ्या गडबडीत माझ्या डोळ्यात धूळ उडाल्यामुळे मी डोळे चोळत राहिलो. चांगलं डोळ्यातून पाणी-बिणी येईपर्यंत चोळून झाल्यानंतर मी नानीला टाटा करण्यासाठी खिडकीबाहेर पाहायला गेलो, तर एष्टी होळीच्या शेतापर्यंत पुढे निघून आली होती.

                                      मला कसंतरीच वाटायला लागलं. विंडोशीटवर बसून मी खिडकीबाहेरचा देखवा पाहत होतो. पण तो पाह्ताना मला रोजच्यासारखी मजा येत नव्हती.
                                      कुणीतरी मुद्दामहून सोडल्यासारखा बिनडोक वारा खिडकीतून सरळच्या सरळ आत येउन माझ्या चेहरयावरच आपटत होता. ड्रायव्हर साहेब गाडी उगीचच्या उगीच नको तेवढी सुसाट चालवत होते. त्यामुळे घरं, झाडं-झुडुपं, शेतं, नद्या- डोंगरं सगळं पटापट मागे पडत चाललं होतं. दुपार असूनसुद्धा उन पडलंच नव्हतं. आकाशातले सफेद ढग कुठेतरी पळून जाउन लपून बसले होते. त्यांना शोधण्यासाठी एका मोठ्ठया काळ्या ढगावरती राज्य आलं होतं. मधूनच कुठल्यातरी ढगाच्या पोटात गुडगुड काय होत होतं, मध्येच वीज काय लपून चमकत होती आणि तर आणि पाउससुद्धा छोट्या शेंबड्या पोरासारखा येउन, चिडवून पटकन पळून जात होता. जमिनीवर कुठे-कुठे पोपटी गवत उगवलेलं आणि कुठे-कुठे तर त्याला उगवायचं विसरल्यासारखंच झालं होतं. मला बाहेर बघायचा आणखीनच कंटाळा येऊ लागला. त्यामुळे वैतागून जाउन मी डोळेच मिटून घेतले.

सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता. पुन्हा एकदा मी त्याच अंधारया गुहेत एकटा उभा होतो. माझ्या पायाजवळ एक गुलाबी रबरी बॉल पडून होता. कुल्याप्पानं जोरदार सिक्सर मारून दीपाताईच्या घराच्या मागच्या परसात घालवलेला रबरी बॉल! तोच तो. आम्ही कितीतरी वेळ शोधूनसुद्धा सापडलाच नव्हता तो. पण फक्त मलाच असं वाटत होतं की तो पेरूच्या झाडाजवळच्या बिळातच गेला असणार म्हणून. त्या चमन गोटयाला मी उचलून घेतलं. त्याला हातात गच्च पकडून मी पळू लागलो. 
पळतच मी त्या गुहेच्या बाहेर आलो. ती दीपाताईची परसबाग होती. पेरूच्या झाडावरचे दोन-तीन पेरू मला पाहून हळूच पानांआड लपले. ते पाडण्यासाठी मी दगड शोधायला पुन्हा पळालो. 
नदीच्या काठाजवळून मी भरपूर रंगीबेरंगी खडे खिशात भरून घेतले. बाजूच्या झाडीत 'आब्या ' उभा होता. लाडूएवढया आकाराची काळी-काळी करवंद त्याच्या हातात होती. आम्ही दोघं पळत पळत विहिरीपाशी आलो. 
विहिरीतलं कासव पाण्याच्या वर येउन आमच्याकडेच हसत पाहत होतं. 
"या ", ते म्हणालं. 
रोंगीताईनं आमच्या डोक्यावर एक-एक कळशी ठेऊन दिली. ती सांभाळत आम्ही पायवाटेनं घराच्या दिशेनं चालू लागलो. आमच्यापुढे मीनाताई दोन हंडयांच्यावर एक कळशी डोक्यावर घेऊन चालली होती. 
राक्याच्या अंगणात राक्या गळ्यात बेचकी अडकवून ऐटीत उभा होता. बाजूला त्याची गोल-गोल पापड लाटण्यात पटाईत असलेली शमाताई अंगण झाडत होती. 
मी त्या पायवाटेने घरी निघालो होतो. 
त्या पायवाटेच्या आजूबाजूला बरीच माणसं येउन उभी राहिली होती. ओळखीचीच होती ती सगळी. 

प्रत्येक मॅचमध्ये चिडचिडी करणारा सत्तुदादा, झाडाच्या पार वरच्या फांदीपर्यंत चढणारा वैब्या, रडकू रामा, दिवसभर नुसता गाडाच फिरवत बसणारा डबडू, नेहमी केसात अबोलीच्या फुलांची वेणी घालणारी मीनाताई, आमसुलं खायला देणारी आशाताई, ढोकी वाजवताना डोळे बंद ठेवणारे संदीपदाचे बाबा, दुकानातला मारुतीदादा, चक्कीवाले पांढरेकाका, बैलगाडीवाला मंग्यादादा, देवळातली बयोआज्जी, चीकारी आंब्याजवळच्या घरातली खडूस जनीआज्जी, दिवसभर बडबड करणारी आमची आज्जी, झाडावर कितीपण मुंगळे असले तरी त्याच्यावर चढून आंबे काढणारा नाना… सगळेच्या माझ्याकडेच पाहून हसत होते. लाडातच!

लांबूनच मला घराच्या पडवीत खुर्चीत बसलेले अण्णा दिसले. ते पण माझ्याकडेच पाहून हसत होते. मी पटापटा चालत माझ्या आमच्या अंगणाजवळ आलो. अंगणाच्या दारातच एक हसरी बाई उभी होती. छानपैकी बारकुशा फुलाफुलांच्या नक्षीवाली साडी घातलेली, घारया डोळ्यांची. बाहूलीच जशी. नानीच ती!
मला काजुबियांची भाजी, पाटयावरची चटणी, गोड शेंगा असलं सगळं माझ्या आवडीचं बनवून देणारी, मला रानात, नदीवर, विहिरीकडे फिरायला नेणारी, माझे लाड करणारी माझी गोड गोड नानी. 
नानीने माझ्या डोक्यावरची कळशी उतरण्यासाठी हात पुढे केले. ती कळशी उतरणार, तेवढ्यात कुणीतरी मला जोराचा धक्काच दिला. 
"शीट नंबर पस्तीसssss -पाठी जा -पाठी जा sss-तिकीट दाखवाsss तिकीट -टींग टींग, तिकीटsss टांग टांग टींग,खाड खाड- नंबर पस्तीसsss, घँग-गँग-ग्याँय्य्यय्य्य्यांग गँगँग, लगेजss लगेजss, टींग टींग रिजर्वेशनsss" एक अख्खाच्या अख्खा खाकी शर्ट आणि लांबोडकी खाकीच पँट घातलेला लाल डोळ्यांचा माणूस होता तो. त्याच्या एका हातात तीक्टींना भोक पाडायचं यंत्र होतं. हळू-हळू तो माणूस मोठा मोठाच व्हायला लागला. त्याच्या हातातलं ते यंत्र तर कुल्याप्पाच्या बॅटीएवढं मोठं झालं. त्या राक्षसाने त्याचा दुसरा भलामोठा हात पुढे आणून माझ्या शर्टाची कॉलरच धरली आणि लगेच त्याने त्याच्या दूसरया हातातलं यंत्र माझ्या छातीवर धरून 'खटॅक्क' करून दाबलं!
माझ्या छातीवर रबरी बॉलएवढं मोठ्ठं गोल भोकच पडलं. त्यातून लालेलाल रक्त बाहेर यायला लागलं. 
रक्ताच्या रंगसारखीच एक लालेलाल एष्टी बाजूला उभी होती. त्या खाकी राक्षसानं मला उचलून त्या एष्टीत फेकलं. मी खिडकीतून आरपार जाउन आडवातिडवाच शीटवर पडलो. 
एष्टीत देवळातल्या घंटेएवढी मोठ्ठी घंटा लावलेली होती. तिला जी मोठ्ठी दोरी बांधलेली होती त्याचं दुसरं टोक त्या राक्षसानं हातात धरून जोरात दोनदा ओढलं. जोराचा खोकला आल्यासारखं घसा खाकरून आणि धूर थुंकून एष्टी चालू झाली. 
मी खिडकीतून खाली पाहू लागलो. रस्त्यावर मघाचीच सारी माणसं जमली होती. मी त्यांच्यापासून लांब चाललो होतो. यावेळी माझ्या डोळ्यात जायला धुळबिळ नव्हती. तरीही डोळ्यातून खूप सारं पाणी येत होतं. डोळ्यांसमोर आलेल्या त्या पाण्याच्या पडद्यापाठी खजिन्याचा सोनेरी प्रकाश हळू-हळू कमी होऊ लागला. गुहेतला अंधार मात्र भसाभसा वाढू लागला. 

                                      मौल्यवान खजिना पाठीमागे टाकून आमची एष्टी सुसाट वेगाने पळत होती. एका मोठ्ठया अंधारया गुहेतून. पण खजिन्यापासून लांब. उलट दिशेने.






                                                             
                                                    _______***समाप्त***_______ 


                                                                                कशी वाटली गोष्ट? 
                                                                                जरूर कळवा…