बुधवार, २३ जुलै, २०१४

२. खजिना : भाग तीन

                                        एके दिवशी मी घरातल्या सगळ्यांसाठी पेप्सीकांडी घेऊन आलो. अण्णांना सुद्धा आम्ही एक लेमनपेप्सी दिलेली. ते पेप्सी खात असताना मी लपूनच त्यांना पाहत होतो. पेप्सी मस्तपैकी खाउन झाल्यावर अण्णांनी पेप्सीचा प्लाष्टिक कागद हातातच धरून ठेवला आणि ते त्यावरची इंग्रजी अक्षरं वाचू लागले. अण्णा!

                                       अण्णांना काहीतरी वाचताना मी पहिल्यांदाच पाहत होतो. पटकन मला एक युक्ती सुचली. गावाला येताना मी ठकठक, चांदोबा, चंपक असली चार-पाच गोष्टींची पुस्तकं वाचायला म्हणून आणली होती नि पहिल्या दोन दिवसांतच वाचून संपवलेली सुद्धा. त्या दिवशी संध्याकाळी अण्णा पडवीतल्या त्यांच्या खुर्चीत चहा पीत बसले असताना मी गुपचूप ती पुस्तकं त्यांच्या कॉटवर उशीशेजारी ठेऊन दिली. थोड्याच वेळाने अण्णा येउन कॉटवर बसले. त्यावेळी मी काजूच्या बिया मोजण्याचं काम लक्ष देऊन करत होतो. म्हणजे हाताने बिया मोजत होतो, पण लक्ष मात्र अण्णांवर ठेऊन. अण्णांनी पुस्तकांकडे एकदाच सरळ पाहिलं आणि पुन्हा ते नेहमीच्याप्रमाणे त्यांचा भिंतीकडे टक लावून बघण्याचा कार्यक्रम करू लागले. फुस्स्स!
माझा प्लॅन साफ फसला. बिया मोजण्याच्या तश्श्शाच ठेऊन मी रागाने स्वयंपाकघरात, चुलीजवळ जाउन बसलो. मला भूक लागलीये असं वाटून नानीने मला बुद्धूसारखं जेवायलाच वाढलं. शिवाय आणि मी डब्बल बुद्धू रागारागाने जेवलोसुद्धा!
                                       मोरीत हात धुवून मी जेव्हा वरती माझघरात जायला लागलो तेव्हा दारातूनच मी पाहिलं. अण्णांच्या हातात चांदोबा होतं!! ते मस्तपैकी झोपून-बिपून ऐटीत पुस्तक वाचत होते.

लाडातच!

                                      अण्णांचं बरोबरच होतं. विरारला आमच्या चाळीच्या पुढे जी कौलारू आडवी चाळ आहे की नाही, त्यातल्या शेवटच्या घरापुढल्या जागेवर कोपरयात तीन-चार बालवाडी, पहिलीतली पोरं-पोरी मिळून 'घरपणी' खेळत असतात. मस्तपैकी लाकडी पाट वगैरे  लावून, जत्रेतली खेळण्यातली भांडीकुंडी ठेऊन ते खेळतात. त्यांच्या खेळामध्ये शेतावर जाणारे बाबा असतात, जेवण बनवणारी आई असते, त्यांची दोन मुलं असतात. रात्रीचं जेवण केल्यानंतर ते लोक बुद्धुसारखे तिथेच रांगेत झोपतात सुद्धा! लाडातच.
                                     त्यांच्या बाजूला बसून त्यांचा खेळ बघत बसायला मला फार आवडतं. एकदा आईने दिलेल्या एक रुपायाचे चणे घेतल्यावर मी त्यातले अर्धे त्यांना खायला दिले तर त्या बुटक्या लोकांनी एकेका चण्याचे छोटू-छोटूशे तुकडे करून डाळभातासारखे खाल्ले!

                                       पोरं म्हणजे पण ना बोरंच आहेत ती. पण पिकलेली. गोड गोड. त्यांचा खेळ पाहून मलाही त्यांच्यासोबत फार खेळावंसं वाटतं. घरातून लाकडी पाट आणावा आणि त्यावर रंगीबेरंगी खडे, काडेपेटी, झाडांची फळं, पानं-फुलं तोडून आणून छानपैकी दुकान थाटावं आणि त्यांच्या खेळातला दुकानदार दादा व्हावं. ऐटीत दुकान चालवावं. पण हे होणार थोडीच!त्यांच्यासोबत असलं काय खेळताना कुणी मला बघितलं की संपलंच.
                                      'आयलट- बायलट पोराची पोरगी, आपला आक्शय झालाय पोरगी' असं अख्खी वाडी चिडवायला लागणार. पुन्हा काही खेळायला गेलं की खेळात आपल्यालाच बकरा करणार. आपल्यावरचं राज्य मग अंधार पडेपर्यंत जायचं नाव नाही. अण्णांनासुद्धा त्या पुस्तकातल्या गोष्टी आपण वाचाव्यात असं मनापासून वाटत असणार पण ती छोट्या मुलांच्या गोष्टीची पुस्तकं वाचताना आपल्याला कुणी पाहिलं तर चिडवतील, असली भीती त्यांना वाटत असणार. नक्कीच.

                                      अजुनी मला चुलीजवळ बसलेलं पाहून नंदिआत्यानं आरडाओरडच सुरु केली.तिच्या आवाजाने कंटाळून टोपलीपाठची मनीसुद्धा बाहेर येउन तिची ऐटदार शेपटी उडवत आळस देत- देत परसात निघून गेली. मला पण मनीसारखं आळस देत परसात जायचं होतं पण तसं करणं आता फारच धोक्याचं होतं. मला भरपूर रागावल्यावर नांदी आत्या पाय आपटत माळ्यावर निघून गेली. नानीनं माझ्यासाठी तपेल्यातलं गरम पाणी बादलीत ओतून दिलं. मग मी माझा टॉंवेल घेण्यासाठी माजघरात गेलो तर नाना, आज्जी, नंदिआत्या यांची फौज एकत्र होऊन माझ्यावर जोरजोरात रागावू लागली. त्याचं चक्रव्युह तोडून मी कसा-बसा पुन्हा मोरीत आलो तर आज्जी मराठ्यांसारखा पाठलाग करत माझ्यामागून मोरीपर्यंत आली! शेवटी तिने पुन्हा एकदा फिरून सगळ्यांवर रागावून झाल्यानंतर मी अंघोळीला सुरुवात केली.

                                      सर्व तयारी झाली होती. मी, नंदीआत्या नवीन कपडे घालून बसलो होतो. गाडी येण्याची वेळ झाल्यावर मी देवघरातल्या देवांच्या पाया पडलो. घरातल्याही सगळ्यांच्या पाया पडलो आज्जीच्या पाया पडायला गेलो तर ती रडायलाच लागली नानीच्या पाया पडायला गेल्यावर तिने मला जवळ ओढून घेतलं. तिच्या साडीच्या पदराला जो मस्तपैकी छान आणि ओळखीचा असा वास येत असतो तो कुठल्या तरी डबीत भरून घेऊन आपण सोबत नेला पाहिजे, असंच वाटलं मला.

"मस्ती करू नको. शाळेत नीट जात जा. आईला त्रास देऊ नको आणि गणपतीच्या सुट्टीत लवकSSS र परत ये SSS ऐकलंस?" नानी म्हणाली.
"होSSS , पण तू  मनिला दुध आणि खाऊ देत जा." मी सुद्धा नानीला एक महत्वाची सूचना देऊन टाकली.

"पण आहे कुठं तुझी मनी?"

                                      आम्ही मनिला हाका मारून पाहिल्या. ती कुठेच दिसत नव्हती. तेवढ्यात खिडकीतून आम्ही पाहिलं की, नाना आमची कपड्यांची बॅग घेऊन दुकानाकडे जात होता आणि त्याच्यामागून जणू काही ती स्वतः चीच बॅग असल्याच्या तोऱ्यात मनी कुणाकडेच न पाहता अगदी ऐटीत शेपटी उडवत चालली होती.

लाडातच!!






                                                                                                    उर्वरित गोष्ट पुढील भागात …


   

शुक्रवार, ४ जुलै, २०१४

२. खजिना : भाग दोन

                                      एका वर्षामध्ये असतात बारा महिने. एकूण दिवस तीनशेसाठ. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा.. पुन्हा तेच चक्र सुरु. अण्णा कधीच घराच्या बाहेर जात नाहीत. फक्त माझघरातली कॉट आणि पडवीतली खुर्ची. एकदा मी त्यांच्या त्या लाकडी खुर्चीत बसून पाहिलं. तिथून आमचं घराबाजूचं शेत, शेतातलं नारळाचं झाड, त्यापुढे आडवा गेलेला डांबरी रस्ता आणि रस्त्याच्या पलीकडची घरं, असलं सगळं छानच दिसत होतं. पण किती वेळ? मला कंटाळा यायला वेळ लागलाच नाही. पण मग अण्णांना कंटाळा येत असणार कि नाही? रस्त्यावरून अण्णांएवढे किंवा त्यांच्यापेक्षाही म्हातारे आजोबा लोक इकडे-तिकडे जात असतात, त्यांच्याकडे पाहून अण्णांना कसं वाटत असणार? कुल्याप्पा, विन्या, अभी असले माझे मित्र आले की आमच्या अंगणात आम्ही खूप खेळ खेळतो. दुपारच्या वेळी बाहेर पाहिलं तर गायी-बैलं ढिम्मपणे इकडे-तिकडे फिरत असतात. संध्याकाळच्या वेळी सूर्याची शेंदरी किरणं अंगणात येतात. नारळाच्या झाडावर कुठूनतरी दोन कणेर पक्षी रोज येउन बसतात. छानसा वारासुद्धा अंगणात एकटाच खेळत असल्यासारखा वाटतो. हे सगळं पाहून काहीच बोलावसं वाटणार नाही असं होणार थोडीच!

                                      मला पक्कं माहित आहे अण्णा सगळ्यांशी- आमच्याशी, त्या गायी-बैलांशी पक्षांशी सूर्याशी झाडांशी वाऱ्याशीसुद्धा भरपूर बोलत असणार पण मनातल्या मनात. त्यांच्या मनात सगळ्या गोष्टी-बिष्टींचा मोठ्ठाला खजिनाच तयार झालेला असणार. पण अण्णा म्हणजे त्या खजिन्याची गुहा असलेल्या डोंगरासारखे. सगळा खजिना आत असला तरी बाहेरून एकदम गप्प. पक्के नंबर एक.

                                      आमच्या वाडीतलं मारुतीदादाचं दुकान काही एक नंबर नाही. म्हणजे ते आहे चांगलं. त्यातले चिक्की, बर्फी, आलेपाक, लॉलीपॉप, नल्ली, शेंगदाणे, वाटाणे-चणे, तिखट भडंग वगैरे असलं सगळं कुल्याप्पा म्हणतो तसं "एक लंबर" असतं. पुन्हा सुनील शेट्टीवाली बॉडी असलेला मारुतीदादा आणि दुकानात असताना नेहमी कायतरी खात असणारी नि पटापटा बोलणारी मारुतीदादाची बायको हे पण चांगलेच. मारुतीदादाच्या बायकोला सगळे 'मारुतीदादाची बायको' असंच म्हणणार. लाडातच!
                                      तर असल्या त्या आमच्या वाडीतल्या एकच्या एकच असणारया दुकानात एक चांगली आणि महत्वाची गोष्ट नाहीच. फ्रीज.
                                      त्यामुळे आमच्या एवढ्या जगातल्या सर्वच पोरा-पोरींसाठी अत्यंत आवडीची आणि जीव की प्राण असणारी गोष्ट दुकानात नाही, ती म्हणजे कांडीपेप्सी.
                                     कांडीपेप्सी जर पाहिजे असेल तर मात्र आपल्याला सिंदबाद सारखी एक सफरच करावी लागणार. ती पण सिंदबाद पेक्षाहि साहसयुक्त.

                                      आमच्या वाडीतून पुढे गेलेल्या डांबरी रस्त्याने चालत पुढे निघालं तर मोठ्ठ्या पिंपळाच्या उतारानंतर येतं होळीचं शेत. तिथून एक मोठं वळण घेत घेत पुढे रस्ता जाणार काळ्या आंब्यापाशी. त्याच्यापुढे बामणाचं घर, त्यापुढे पुन्हा उतार मग बालवाडीच्या पुढे पिठाच्या गिरणीपाशी रस्ता वर चढू लागला की त्याच्या टोकावरच बाजूला आहे ते म्हणजे गुरावांचं दुकान. कांडीपेप्सीच्या खजिन्याचं दुकान.
                                     पण हे सगळं पार करून जायचं म्हणजे खायचं काम नाही काही! एकट्याने जायचं तर नावंच नको. दोन भिडू तरी पाहिजेत. पुन्हा चप्पल 'कंपनसरी'.  नाहीतर उन्हाने डांबर इतकं तापलेलं असतं की पाय भाजणारच. एकदम खरपूस. पुढच्या वळणापर्यंत जायला तसं काही नाही. पण वळण संपल्यावरच समोर असणार 'काळा आंबा'. खतरनाक भुतांच्या बापांचा अड्डा!!
                                      तो आंबा यायच्या आधीच त्याच्याकडे न बघता पळत सुटायचं ते डायरेक बामणांचं  घर यायच्या आधी स्टॉप. एकदम स्टॉप. कारण बामणांच्या त्या कंपावणात असणार तीन-तीन कुत्रेसाहेब.  पिक्चरमध्ये बोलतात तसं खूनखार की काय तसले. ते कुत्रे जर कंपावाणाच्या आत असले तर ठीक.  रस्त्यावरनं चूपचाप न पळता पुढे चालत गेलं की काम झालं. पण जर का ते तीन तिघाडे रस्त्यावरच झोपलेले असतील तर मात्र 'सावधान! पुढे धोका आहे'. पेप्सी-बिप्सी विसरून गप उलट फिरायचं आणि त्या साहेब लोकांच्या घशातून अर्रररफफ अर्रररफफ असा आवाज यायच्या आधीच छुमंतर व्हायचं.

                                      एवढे तीन-तीन कुत्रे त्या घरातल्यांनी ठेवलेच कशाला? असं विचारलं कि आज्जी सांगणार, "बामनांच्या घरात रानारे दोघेच. बामन म्हतारा आनी म्हातारी बामनीन. त्यांचं प्वार-बीर सगलं मुम्बैलाच. बामनाचा वाडा म्हंजे लय जुना. त्यात बामनाच्या पनज्यानं माजघराखाली ठेवलाय सोन्याच्या म्होरांचा हंडा. त्या हंड्याव लक्ष ठेवनाऱ्या चोरांची झाली भुतं. ती सगली जमली काल्या आंब्याव आनि लागली बामनाला तरास देयाला. त्येव्वा बामनाने टेटवलीच्या शंकराच्या देवलातल्या पुजारयापासना त्याच्या कुत्रीची तीन पिल्ला आनली. तीच हि तिघव कुत्री. पन त्यांना भ्यायचं नाही.  कुत्रं  म्हनजे दत्तगुरुचं वाहन. त्यांच्या डोल्यातून  दत्तगुरुच आपल्याला पाहत असतात. म्हनून रोज सांजावतीला अंघोली करून शुभं करोति म्हनावी, दत्ताची आरती करावी. मग काय ती कुत्री आपल्याला तरास देयाची नाहीत."
                                      आरती केली की म्हणे कुत्रे भुंकणार नाहीत! कायपण. आज्जी असलं बोलणार नि आम्ही ऐकणार? नावच सोडा.
                                      असलं ते बामणांचं घर. पण ते एकदा ओलांडलं की पुढे काळजीचं काम नाही. सरळ गुरवांचं दुकान. गुरवकाकांनी त्यांचा फ्रीज उघडला की त्यात ऑरेंज, पायनेप्पल, मँगो, जलजीरा, लेमन सगळेच फ्लेवर असणार. त्यांनी पेप्सी आपल्यासमोर धरल्या की त्या पाहूनच आपले डोळे थंड पडणार. मग तो मौल्यवान खजिना घेऊन परत घरी येताना खिशापेक्षा छातीच जास्त भरल्यासारखी वाटते अशा वेळी. कसल्याशा थंडगार ओझ्याने. तुडूंब.




                                                                                               
   
                                                                                             उर्वरित गोष्ट पुढील भागात …