शुक्रवार, १३ जून, २०१४

२. खजिना : भाग एक

                                   
                                       का अंधारया गुहेतून मी एकटाच चालत होतो. माझ्या हातात मशालसुद्धा नव्हती. ती गुहा जिथे संपणा, तिथे फार मोठा खजिना असणार होता. डंपरने टाकलेल्या रेतीच्या ढिगाऱ्याएवढा, सोने, हिरे, पाचू आणि माणिकयुक्त खजिना! त्या खाजिन्यासाठीच मी एकदम शूरपणे कशालाच न घाबरता गुहेच्या आणखी आत-आत चाललो होतो. हळू-हळू पुसटसा प्रकाश गुहेत दिसू लागला. खजिना आता जवळ आलाच असं वाटून मी आणखीन जोरातच चालू लागलो. अचानक माझ्या डोळ्यांपुढे झगझगीत सोनेरी प्रकाश आला. त्या प्रकाशाने डोळे दिपून जाउन मी ते घट्ट मिटूनच घेतले. आता आपल्याला तो अवाढव्य खजिना दिसणार म्हणून मग मी अलगद डोळे उघडले, तर माझ्या कपाळावर उन्हाचा एक तळहाताएवढ्या आकाराचा कवडसाच पडला होता. समोरच्या खिडकीतून येउन ते कवडसेबुवा सरळच्या सरळ माझ्या कपाळावरच बसले होते.

लाडातच !

                                      मला ते एकदम छानच वाटायला लागलं. कवडसेबुवांमुळे कपाळावर गरमागरम गुद गुलीच व्हायला लागली. सूर्यमहाराज माझ्यावर प्रसन्न की काय ते होऊन आशीर्वादच देत असणार. नक्कीच! खरंतर आणखीन भरपूर वेळ मला असंच अंथरुणात झोपून रहायचं होतं. पण लांबूनच मला आज्जीचा आवाज ऐकू येऊ लागला. कुणाशिकी बोलत ती घरीच येत होती. घरी येउन तिचा रेडीओ सुरु होण्यापूर्वी उठणं आता गरजेचं होतं.
                                       अंगणातल्या कट्ट्यावर येउन बसल्यामुळे बरं वाटू लागलं. सगळीकडे कसं झगमगीत उन पडलं होतं. रोजच्या रोज सकाळी उठून असल्या सोनेरी उन्हात बसल्यामुळे लवकरच आपलं अंग संपूर्ण सोनेरी सोनेरी होणार; एकदम सोनेरी राजपुत्रच! मग आपण एखाद्या सोनेरी केसांच्या राजकन्येला दुष्ट जादुगाराच्या तावडीतून सोडविण्यासाठी घोडयावर वगैरे बसून जाऊ असंच वाटायला लागलं.  पण तितक्यात अचानक डोक्यावर भला मोठ्ठा चंदेरी मुकुट घातलेला एक दुष्ट जादुगार अंगणात, माझ्या पुढ्यात येउन उभा राहिला.

"तुझ्या आत्यास काई कळत नाई ते नाई, तू पन तसलाच! दुपारच्या गाडीनं जायचं तर बा लवकर उठीन,  अंघोळी करीन, चाफ्याची चार फुला तोडून आनीन, ते काई नाई निसतं तंगड्या वर करून झोपायचं. आनिसारा पोरगा असता तर" …….
                                      आज्जीच्या बोलण्याने माझं डोकंच तापू लागलं. कानातून वाफ-बिफ निघाल्यासारखं सुद्धा वाटलं. शेवटी गरम वाफ सोडण्यासाठी कुकर शिट्टी वाजवतो की नाही, तसंच मी घट्ट आळस देत ओरडलो, "कूऊऊऊउक SSSS.... "
                                      शिट्टी वाजवून झालेल्या कुकरसारखं मोकळं मोकळंच वाटायला लागलं मला. पण मी पाहिलं, आजी डोक्यावरची कळशी दरवाज्याजवळ उतरून ठेऊन पुन्हा माझ्याकडेच यायला निघाली होती. दुश्मन हमला करायच्या आधीच गनिमी कावा करून पळणं गरजेचं होतं.

"हरSS हराSSS महादेवSSSS..."

                                     मी कट्ट्यावरून उडी टाकून मागल्या परसात पळालो. तिथून गुपचूप स्वयंपाक खोलीच्या दरवाज्याने आत शिरून, चुलीजवळ जाउन बसलो. एकदम सहीसलामत आणि सुखरूप. बादशहा आज्जीच्या हातावर तुरी कि काय ते देऊन.

                                      घरामध्ये आज सगळ्यांची घाईच-घाई उडाली होती. नानीची पाट्यावर चटणी वाटायची घाई, नानाची लाकडी पेटीत आंबे भरायची घाई, नंदी आत्याची बॅगेत कपडे भरायची घाई आणि आज्जीची? सगळ्यांना बोलायची घाई! बाकीच्या तीन जणांना मात्र कसलीच घाई नव्हती. मला, टोपलीपाठी लपून राहिल्या मनीला आणि बाहेरच्या पडवीत खुर्चीत बसून राहिलेल्या अण्णांना.

                                      तसं  तर आमच्या अण्णांना कधीच घाई नसते. ते माझघरातल्या त्यांच्या कॉटवर किंवा बाहेरच्या पडवीत ठेवलेल्या त्यांच्या खास खुर्चीत बसूनच असतात. त्यांच्यासोबत नेहमी ती त्यांची खासम खास काठी असते. पण अण्णांना काठीने टेकूनसुद्धा चालता येत नाही. ते बसूनच सरकत-सरकत त्यांच्या कॉटपाशी येतात. तिथं असलेल्या माझघराच्या मधल्या खांबाला पकडून उभे राहताना त्यांचे पाय थरथरत असतात. खांबाला धरलेला हात सोडून ते पटकन पडल्यासारखे कॉटवर बसतात. ते सगळं रोज पाहताना माझ्या लक्षात येऊ लागलं की नक्कीच त्यांचे पाय जाम दुखत असणार. त्यांना खूप वर्षांपुर्वी लकवा मारला होता असं पप्पांनी मला एकदा सांगितलेलं. मला काय तेव्हा ते नीट कळालंच नव्हतं. कुणीतरी लकवा नावाचा एखादा प्राणी-बिणी असणार आणि त्याला काठीने मारल्यामुळे देवाने अण्णांना शिक्षा केली असणार असंच मला वाटत होतं. पण लकवा म्हणजे की नाही एक बरा न होणारा आजार असतो. त्याच्यामुळे आपल्या पायातली शक्तीच जाते आपल्याला चालता-फिरता येत नाही. साधं उभं पण रहायला जमत नाही!
नानाकडून असलं सगळं ऐकल्यावर खरं तर मलाच माझ्या पायातून शक्ती निघून गेल्यासारखं वाटलं. अण्णांसाठी मला खुपच्या खूपच वाईट वाटलं; रडूसुद्धा आलं. का, कुणास ठाऊक? पण आलं.


                                      तेव्हापासून मग मला अण्णांची भीती वाटायचीच बंद झाली. मी त्यांच्या कॉटजवळ जाउन बसू लागलो. अण्णा काय आणू मी? असं त्यांना विचारू लागलो. त्यांच्या पानाच्या ताटात पान-सुपारी वगैरे आहे की नाही, ते पाहू लागलो. नसली तर नानीकडनं घेऊन ठेऊ लागलो. ते मशेरी लावत असतील तर त्यांना कोमट पाण्याने भरलेला तांब्या नेउन देऊ लागलो. अण्णांसाठी आपण सतत काहीना काहीतरी आणत राहिलं पाहिजे असंच वाटायचं मला.

                                      मी जवळ गेलो कि अण्णा माझ्या पाठीवरून हात फिरवतात. त्यांच्या त्या सफेद केसांच्या दाढीमधून हसतात. "अऎ शाब्बास! छान छान", असं म्हणतात. पण तेवढंच. त्यानंतर मग ते असेच समोरच्या भिंतीकडे टक लावून बघत बसतात. पुढे काही बोलतंच नाहीत. का पण ?

                                      हळू-हळू माझ्या लक्षात येऊ लागलं की आमच्या घरातलं कुणी कुण्णीच अण्णांशी बोलत नाही. म्हणजे घरी आल्यावर सगळे त्यांना हाक मारतात, जेवताना, झोपताना आणि बाकीच्या वेळी त्याना काय हवं, काय नको, ते विचारतात सुद्धा. पण त्यांच्याजवळ नीटपैकी बसून, आज काय-काय झालं,  काय-काय केलं, याचं काय झालं, त्याचं काय झालं, असलं जे काही नाना नानी किंवा आत्या आज्जीचं चालू असतं तसं अण्णांशी कुणीच बोलत नाही. फक्त एक माणूस सोडून.

                                      सुट्टीत पप्पा जर केव्हा गावी आले तर ते मात्र अण्णांशी जाम बोलणार. सारखे त्यांच्याजवळ बसून राहणार. त्यांना स्वतःबद्दल किंवा माझ्याबद्दल काय नि काय सांगत बसणार. शिवाय आणि पप्पा लहान असताना ते अण्णांना कसे घाबरायचे, अण्णा कसे खूप कडक शिस्तीचे होते, ते पप्पांना आणि काकांना कसे बेदम मारायचे, मग अण्णांचे बाबा - म्हणजे पप्पांचे आजोबा पप्पांचे किती लाड करायचे,  त्यांना खाऊसाठी भरपूर पैसे द्यायचे, त्याच्या सगळ्या गोष्टी-बिष्टी तर पप्पा सारखेच सांगणार. पण त्या गोष्टी कितीही वेळा परत-परत ऐकल्या तरी मला कंटाळा येतच नाही. पप्पानी आणखी हजार वेळा जरी त्या गोष्टी सांगितल्या तरी तेवढयाच हज्जार वेळा मी त्या गोष्टी ऐकणारच!
                                      पप्पांचं पाहून मीसुद्धा जेवायला अण्णांच्या बाजूला बसतो. अण्णा जेवायला बसणार एकदम ताठ. मी पण त्यांच्यासारखा ताठच बसणार. पण आमची भाकरी खाऊन होईपर्यंत आमचे पाठचे पाठोबा थकतात आणि पुढचे पोटोबा आणखी पुढे येतात.
                                      आमचं नेहमी असंच. आई म्हणते तसं, "आधीच हौस, त्यात पडला पौस!"






                                                                                                       उर्वरित गोष्ट पुढच्या भागात… 

















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा