शनिवार, १७ मे, २०१४

१. सोनेरी लाटांची गोष्ट : भाग एक


             
                                        ते तलाव म्हणजे अगदी तलावच आहे. त्याचं  नावही आम्हाला सगळ्यांना जाम  येड्च्याप  वाटतं. टोटाळे  तलाव.  टोटाळे?  तशी त्याची आणखीनसुद्धा  नावं आहेत. मोठी माणसं त्याला म्हणतात 'मोठं  तलाव' किवा 'पुर्वेकडचं तळं' किवा कुणी म्हणतं,' बाजारातलं तळं'.

                                         तलाव तसं  आमच्या विरार रेल्वे स्टेशनच्या बऱ्यापैकी  बाजुलाच  आहे.  म्हणजे स्टेशनच्या पुलावरून जर आपण पूर्वेकडे उतरायला गेलो नं कि समोरच तलाव दिसणार. पुलावरून खाली आलं  की  आडवा रस्ता, त्याच्यापलीकडे नगरपालिकेचं छोटुसं मैदान आणि त्याला चिटकूनच पाठीमागे ते कुणीतरी, कधीतरी तयार केलेलं  अवाढव्य तळं. तुम्हाला वाटेल की हे तसं  बरंच  जवळ आहे की!  पण महाराज हा जो मधला आडवा रस्ता आहे ना, तोच पार करून जायला टाईम  जाणार.  कारण तिथे असतो बाजार.  भाजीवाले, फळवाले, प्लाष्टीक सामानवाले, फुलवाले, हातगाडीवाले गोळा-सरबत वाले, कपडेवाले, कुल्फीवाले,  फुगेवाले, गोड कापुसवाले, चम्मच-सुरी विकणारे, भांडीवाले  इत्यादी इत्यादी…  त्या इत्यादी इत्यादींनीच तो रस्ता भरून गेलेला असतो.  शिवाय त्या बाजारात आलेली माणसं, बायका यांच्या एका हातात भरपूर पिशव्या असणार आणि दुसऱ्या हातात त्या बाजाराला कंटाळलेल्या आमच्या एवढ्या मुलगा किवा मुलगीचा हात.  शिवाय एवढ्या गर्दीतूनही प्या-प्या-प्या- करत अंगावर येणाऱ्या काळ्या-पिवळ्या रंगाच्या रिक्शा, मोठ्ठाले टेम्पो आणि ट्रकांच्या  आवाजाने आपलं  डोक  तर दुखणारच.  तलावाच्या तीनही बाजूंनी असा  गडबडबाजार रोजच्या रोज भरलेला असतो.  सगळीकडून गर्दीच गर्दी.  आणि त्या गर्दीच्या मधेच ते गुपचूप पडून राहिलेलं  तलाव.  तलाव तसं  फार मोठं नाही.  छोटंही नाही.  एकदम बऱ्यापैकी.

                                       आमचं  विरार म्हणजे काही एकदम मोठं शहर नाही काही! बाई म्हणतात की  ते एक छोटं नगर आहे. पण कुणीतरी वेड्यासारखे आमच्या नगरच्या बरोबर माधून  रेल्वे रूळ बांधले आहेत. त्यामुळे रेल्वे रुळांच्या या बाजुला  विरार पश्चिम आणि त्या बाजूला विरार पूर्व असे आमच्या विरारचे दोन  भाग पडले आहेत. विरार  पूर्वेला मोठ्ठा  जीवदानी देवीचा  डोंगर आहे त्यावर  जीवदानी  देवीचं  मोठं  मंदिर आहे.  खूप लांब पापडखिंडीचं धरण आहे.  फुलपाडा, मनवेलपाडा आहे.  गावडेवाडी,  गोपचरपाडा, पाचपायरी  आहे.  बाजार आहे.  बाजारातलं  नगरपालिका वाचनालय आहे आणि सगळ्यात महत्वाचं  म्हणजे ते  तलाव आहे.
                                       पण आमचं  विरार पश्चिम ही काही कमी नाही हं ! उलट जास्तीच! आमच्या पश्चिमेला आमची विद्यानिकेतन शाळा आहे.  शाळेपुढचं  छोटं  तळं  आहे.  दरवर्षी जिथे जत्रा भरते ते राम मंदिर आणि डोंगरपाड्यातलं राधा-कृष्ण मंदिर आहे. खेळायला हिराविद्यालायचं मैदान आहे.  मस्तपैकी कौलारू घरं  आणि ऐटदार बंगले असलेले डोंगरपाडा, चोरघे आळी आणि मी राहतो ती  कोलवाडी आहे.मातीचे मडके बनविणाऱ्यांची कुंभारआळी  आहे.  हिरवीगार शेतं  आहेत. शेतांसारख्याच हिरव्यागार दलदली आहेत.  पावरफुल  भुतांचं  स्मशान आहे.  चिखलडोंगरी  गावात जाणारा चेटकीणींचा  रस्ता  आहे.  खूप लांब जिथे नारळाच्या झाडांची आडवी, न संपणारी रांग दिसते, त्यापलीकडे आगाशी, अर्नाळा गावं  आहेत.  अर्नाळ्याला तर मोठ्ठाला समुद्र पण आहे.  आणि नुसता समुद्रच नाही तर त्याच्याआत पाण्यात किल्ला पण ! इतकंच  नाही, विरार मधलं  सगळ्यात टॉप चं  श्रेया हॉटेल, एकच्या एक असलेलं  वूडल्यांड थिएटर  आणि दळवी काकांची भरपूर फ़ेमस वडापावची गाडी पण पश्चिमेलाच आहे.  म्हणजे तुम्हाला कळलं नं ? विरार पूर्व पेक्षा आमच्या विरार पश्चिमेलाच खूप चांगलं चांगलं  आहे.  पण हे त्या पूर्वेला राहणारया  आमच्या वर्गातल्या बुद्धू मुला-मुलींना कळतंच नाही. सारखे भांडतात.
                                   
                                      आमच्या शाळेपुढचं  तलाव  टोटाळे  तलावापेक्षा खूपच लहान आहे. म्हणजे या तलावाच्या सारखे आणखी सहा तलाव एकत्र केले तर एक टोटाळे तलाव होईल, असं  आमच्या वर्गातला शंतनू सावंत  बोलतो.  त्याचा कुणीतरी काका की  कुणीसं तलावाजवळ राहतं  म्हणे; आणि त्यांच्या घराच्या खिडकीतूनच तलाव दिसतं, असं  तो म्हणतो. पण शंत्या पक्का खोटारडा आहे. वर्गात शायनिंग मारण्यासाठी तो भरपूर खोटं बोलत असतो. सुरुवातीला आम्हाला पण त्याचं बोलणं  खरं  वाटायचं. एकदा त्याने शाळेच्या समोर असलेल्या चिंचेच्या झाडाला दोन डोळे आलेले पाहीले. मैदानातल्या घसरगुंडीवर बसून आम्ही आठ-नऊ मुलं त्या झाडाकडे नीटच  पाहत होतो. शंत्याने आम्हांला झाडाच्या खोडावर आलेले दोन डोळे दाखवले. पण त्यानंतर आमच्यातल्या प्रत्येकालाच त्या झाडावर ठिकठिकाणी डोळे दिसू लागले. चिऱ्या जाधवला तर वरच्या दोन मोठ्या फांद्या या राक्षसाच्या हातासारख्याच दिसू लागल्या. हळूहळू त्या झाडाच्या जागी भरपूर डोळे आणि हात असलेला राक्षसच उभा असल्यासारखा आम्हाला वाटू लागला. भिती वाटून आमच्या पोटात दुखायला लागलं . धपाधप उड्या  टाकून आम्ही साऱ्यांनी वर्गात धूम ठोकली. चिंचेच्या झाडामध्ये गिऱ्या  राक्षस राहतोय, त्याला खूप सारे हात आणि डोळे आहेत, त्या डोळ्यांमधून तो आपल्याकडे रागाने पाहतो, अशी बातमी बालवाडीच्या वर्गापासून ते चौथीच्या वर्गापर्यंत वाऱ्यासारखी  पसरली. मधल्या सुट्टीत खूप आरडाओरडी झाली. पहिली-दुसरीची पोरं  तर उगाच इकडे-तिकडे कोकलत पळत होती. सुट्टी संपून बाई वर्गावर आल्या तरी आम्ही सगळे  भितीने  कुजबुजत होतो.  कारण शाळा सुटल्यावर आम्हां  सगळ्यांना त्याच चिंचेच्या झाडाजवळच्या रस्त्याने घरी जायचं होतं. तेव्हा त्या झाडाने  पटकन आपल्या फांद्या पुढे करून कुणाला मिठीच मारली तर ? बाम भोले! शेवटी वर्ग मॉनिटर नेहाने भितभितच चिंचेच्या झाडाचं अख्ख्या शाळेला कळलेलं  गुपित बाईंना सांगितलं. त्यावरून मग नेहाला ओरडा, डोळ्यांचा शोध लावलेल्या आम्हां  आठ-नऊ  जणांना  हातावर  दोन-दोन पट्ट्या आणि अख्ख्या  वर्गाला दम भरून झाल्यावर बाईंनी," हे असं  काही नसतं, सगळे आपले भासच असतात", असं  काहीतरी बरंच  सांगितलं.
                                     त्यादिवशी शाळा सुटल्यावर शंत्याला  आम्ही आठ-नऊ जणांनी चांगलाच धुतला. घरी जाताना त्याच्याच कपाळावर दोन डोळे आले होते. असला तो शंतनू सावंत! पण तरीसुद्धा पुढे कितीतरी दिवस त्या चिंचेच्या झाडाजवळून जाताना ते झाड त्याच्या आठ-दहा डोळ्यांपैकी कुठल्या तरी डोळ्यांनी आपल्याकडे पाहतंय असं  वाटून पोटात दुखुच लागायचं. मग झाड जवळ आलं  की  आम्ही धूम पळणारच!

                                                                                                                                     
                                                                                                     
                                                                                                      … उर्वरीत गोष्ट पुढच्या भागात                                          















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा