गुरुवार, २९ मे, २०१४

१. सोनेरी लाटांची गोष्ट : भाग तीन

                                      सोनेरी लाटांची गोष्ट प्रांजलीकडून ऐकल्यापासून मला काय चैनच पडत नव्हती. कधी एकदा त्या लाटा पाहायला मिळतायत असं झालेलं. पण आमची शाळा दुपारी बारा ते संध्याकाळी पाच वाजून तीस मिनीटांपर्यंत. पळत पळत घरी यायचं म्हटलं तरी सहा वाजणारच. तोपर्यंत सूर्यबुवा त्या लांबच लांब दिसणाऱ्या झाडांच्या रेषेपाठी बुडायच्या अगदी तयारीतच असणार. मग त्या बाजारातल्या टोटाळे तलावावर जायचं तरी कधी आणि कुणासोबत? शनिवारी आमची सकाळची शाळा असते आणि रविवारी तर सुट्टीच, म्हणजे त्या दिवशी हे जमण्यासारखं असतं की नाही? पण ते जमायचं नावच नाही. कारण आई-पप्पा अगोदरच सुट्टीचं गुपित ठरवून ठेवणार आणि मला मात्र सांगणार नाहीत. शनिवारी दुपारी मी शाळेतून घरी आलो की जेऊन लगेच आई नवीन कपडे घालायला देणार. मग कितीही रडलं, आपटाआपट केली तरी फायदा नाही. उलट मारच पडणार. बाहेर पळून गेलं तरी आई आपल्याला शोधत खाली येणार. मग आपण जिकडे खेळत असणार तिथून घरापर्यंत आपली वरातच!
                                      नवीन कपडे घालून आईसोबत रिक्षात बसायचं. स्टेशनला उतरून पुन्हा त्या भंगार ट्रेनमध्ये बसायचं. दादर स्टेशन कधी येतं ते आपल्याला कळतच नाही. कारण तोपर्यंत आपण आईच्या मांडीवर मस्तपैकी झोपलेले. दादर स्टेशनवर आम्ही पोरं 'डोंगराला आग लागली पळा पळा' खेळताना जशी पळतो की नाही तश्शीच मोठी माणसं पळत असतात. अशावेळी मला मोठ्ठयाने ओरडून त्यांना स्टॅचू करावसं वाटतं. एक-दोन-तीन, स्टॅचू SSS! सगळी माणसं स्टॅचू होतील. आईसुद्धा. मग आपण लगेच ट्रेनमध्ये बसून पुन्हा विरारला जाऊ आणि तिथून जोरात ओरडू ओ-व्ह-र SSS. एक-दोन वेळा मी स्टॅचू म्हणालेलो सुद्धा, पण फ़ुस्स्स्स! कुणी थांबलंच नाही.

                                      दादरला गेल्यावर मोठमोठी काचेची दुकानं, डब्बलडेकर बसगाड्या, भारीभारीतल्या रंगीबेरंगी गाड्या रस्त्यावर दिसणार. तेव्हा मग सोनेरी लाटा आमच्या डोक्यातून पार उडूनच जाणार. वरळीला मामाकडे गेल्यार तिथले मित्र, नवनवीन खेळ, व्हिडीओ गेम, रंगीत टि.व्ही.वरचं कार्टून इतकंच नाही तर रात्री दादाबरोबर फिरायला सी फेस वर! सी फेस म्हणजे की नाही एक मोठ्ठाच्या मोठ्ठाला समुद्र. त्या समुद्राच्या किनारी लांबच्या लांब दगडी कट्टा आहे. त्या कट्ट्याजवळ खूप लोक रात्री फिरायला येत असतात. तिथे कुल्फीवाले, चणे-शेंगदाणेवाले, काकडीवाले, मकावाले हे तर असणारच. आपण मस्तपैकी कुल्फी घ्यायची आणि दगडी कट्ट्यावर जाउन बसायचं. पाठीमागे एकदम लांबच्या लांब गेलेला, पिवळ्या दिव्यांनी झगमगलेला रस्ता आणि पुढे आपल्यासमोर समुद्राच्या लाटा. सफेद सफेद फेसाच्या लाटा समुद्रात सारख्या येतच असतात. त्या कधी थांबतच का नाहीत कुणास ठाऊक? पण त्या लाटांचा खूप मस्त आवाज येतो. तो ऐकताना कुणीतरी कानाशी गुदगुल्याच करत असल्यासारखं वाटतं. फिरून पुन्हा घरी येउन आपण झोपलो तरी सुद्धा तो आवाज आपल्या कानाशी वाजत असतो.
                                      रविवारी रात्री उशिरा आपण विरार स्टेशनला उतरून, रिक्षात आई-पप्पांच्या मध्ये बसून घरी कधी येतो ते आपल्याला कळणारच नाही. आपण एकदम ढाराढूर ते पंढरपूरच! सकाळी उठलं की राहिलेला अभ्यास करून, जेऊन पुन्हा आम्ही आमच्या शाळेत. मग वर्गात प्रांजलीला पाहिलं की तिच्या डोळ्यात आपल्याला त्या सोनेरी लाटा दिसू लागणार. कारण प्रांजली कालच्या संध्याकाळी तिच्या आजुबाबांसोबत तलावाच्या त्या दगडी पायरयांवर बसून सोनेरी लाटा पाहून आली असणारच! मग काय? मधल्या सुट्टीत कालच्या सोनेरी लाटांची आणखीन एक नवीन गोष्ट!

                                     एके दिवशी शनिवारी दुपारी मी शाळेतून घरी आलो. हात-पाय-तोंड धुवून जेवायला बसलो, जेऊन सुद्धा झालं. तरी आईने,"आज आपल्याला मामाकडे किंवा आणखी कुणाकडे तरी जायचं आहे", असलं काही मला सांगितलंच नाही. त्यादिवशी मी खूप खेळलो. त्याच्या दुसरया दिवशी पप्पांसोबत बाजारातही जाउन आलो. आणि दुपारी जेऊन पुन्हा खेळायला पळालो.
                                     संध्याकाळी मात्र पप्पा मला घेऊन बाजारात निघाले. पाच-सव्वा पाच वाजले असतील. मला काय तेव्हा बाजारात जायचं नव्हतं. कारण दुपारपासून आमच्या लपाछुपीच्या खेळाला भरपूर मज्जाच येत होती. आम्ही दहा-बारा पोरं पोरी मिळून लपाछपी खेळत होतो. त्यात आज माझ्यावर राज्य येत नव्हतं त्यामुळे चांगलंच वाटत होतं. एवढे जण लपाछुपी खेळत असताना ज्या पोरावर राज्य येईल ते पोरगं रडणारच. कारण मग सगळे त्याला फसवणार. चिडाचिडी करणार. अंधार पडेपर्यंत काही त्या पोरावरचं राज्य जायचं नाव नाही. पुढे दोन-तीन दिवस तरी ते पोरगं लपाछुपी खेळायला येणार नाही. पण तोपर्यंत दुसरा कुणीतरी बकरा होणार. आजचा बकरा आमच्या चाळीपुढचा पिंट्या होता. आपलं राज्य घालवण्यासाठी तो धावतच सगळ्यांना शोधायचा आणि पटापट थप्पे करायचा. पण तरीसुद्धा शेवटी कुणीतरी भोज्ज्या करतच होतं. पिंट्या लवकरच रडकुंडीला येणार होता. मी आणि परशा एकत्रच इथं-तिथं लपत होतो आणि पाच-सहा थप्पे झाले की मुद्दामच बाहेर पळत येउन आउट होत होतो. येऊ दे कुणावर पण राज्य, आम्हाला काय? असेच आम्ही दोघं बैलगाडी पाठी लपलो होतो. अचानक माझ्या शर्टाची कॉलर जोरात खेचली गेली. मी आपोआप उभाच राहिलो. कुणीतरी मला खेचून उठवलं होतं. मी मान वळवून मागे पाहिलं तर मला आमच्या नंदिआत्याचा ड्रेस दिसला. वर पाहिलं तर नंदिआत्याच होती ती. मोठमोठ्यानं काहीतरी बोलत होती. मला काय ते ऐकायचंच नव्हतं. मी तिच्या हातातून निसटून जायला पाहत होतो पण शेवटी ती मला खेचत-खेचत घराकडे निघाली. मी आत्याच्या पाठीवर खूप चिमटे काढून पाहिले. उड्या मारमारून बुक्के सुद्धा मारले. पण मी काही सुटलो नाही. उलट तिने मला धपाटे घातले ते वेगळंच. मीSS नाहीSSजाणारSS, मीSS नाहीजाSS णारSS, मीनाSS हिजाणारSS, मीनाSS नाहीSS जाणारSS. जिना चढताना मी असलं भजनच सुरु केलेलं. पण पुढे तसाच भजन करत करत मी घराच्या दरवाजापर्यंत गेलो आणि एकदम शांतपणे डायरेक्ट मोरीत जाउन पायावर पाणी ओतू लागलो. कारण आमचं भजन आम्ही घरात पोहोचायच्या अगोदरच चहा पीत बसलेल्या पप्पा आणि आईच्या कानावर जाउन पोहोचलं होतं. त्यामुळे मी दरवाजात जाउन उभा राहिलो तेव्हा आई-पप्पांचे डोळे एवढे मोठ्ठाले आणि लालभडक झाले होते की पहिल्याने कोण मारणार, हे त्यांचं ठरायच्या आधीच माझी चड्डी ओली झाली असती!

                                     रिक्षाने आम्ही थेट बाजारातल्या नगरपालिकेच्या इमारतीपाशी आलो आणि माझ्या डोळ्यात लख्ख कि कसा तो प्रकाश पडला. रश्मीबाई म्हणतात तेच बरोबर. आमच्या डोक्यातली टयूबलाइट लवकर कधी पेटणारच नाही. शेजारच्या नरवणे काकांच्या घरातल्या टयूबलाइट सारखी बटण दाबलं की अगोदर झिक-चिक झिक-चिक करणार आणि तिचं स्टारटर कि काय ते फिरवलं की मग ती प्रकाश देणार. रिक्षातून उतरल्यावर असाच कुणीतरी माझ्या डोक्याच्या ट्युबचा स्टारटर फिरवला असणार, असं मला वाटू लागलं.
                                      संध्याकाळ होती. पश्चिम दिशेला सूर्य महाराज बरयापैकी वर होते आणि नगरपालिकेच्या इमारतीपाठी टोटाळे तलाव होता. माझ्या डोळ्यांपुढे प्रांजलीच्या डोळ्यातल्या सोनेरी लाटा चमकु लागल्या.




                                                                   
                                                                                 उर्वरित गोष्ट पुढच्या आणि शेवटच्या भागात… 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा