बुधवार, २१ मे, २०१४

१.सोनेरी लाटांची गोष्ट : भाग दोन

                                       
                                        मला टोटाळे तलाव पाहायला मिळतं, ते म्हणजे बाजारात गेल्यावर. रविवारी पप्पांसोबत बाजारात जायचं म्हणजे एक मज्जाच असते. पण आईसोबत बाजारात जायचं म्हटलं तर काही मज्जा नाही. उलट शिक्षाच! कारण आई म्हणजे पण ना आईच आहे. एक तर ती बाजारात गेल्यावर भाजी घेऊन बसलेल्या प्रत्येक बाईकडे जाणार. अशा भाजीवाल्यांच्या टोपल्यांपुढे, फळ्वाल्यांच्या गाडीभोवती आणि कांदे-बटाटेवाल्यांच्या दुकानांपुढे आईसारख्याच  खूप साऱ्या बायकांचा घोळका असतो. अशा ठिकाणी आई खूप वेळ लावते. शिवाय त्या बाकीच्या बुद्धू बायका आपल्याला पुढचं  काही पाहूनच देत नाहीत. मच्छीमार्केट मध्ये सुद्धा आईसोबत जबरदस्ती जावं  लागतं. मच्छीच्या वासाने मला ओकारीसारखं होतं, हे आईला चांगलंच ठाऊक आहे. तरीसुद्धा ती मला हात धरून आत नेणारच. पुन्हा आत सगळीकडे फिरून फिरून शेवटी पहिल्याच मच्छिवालीकडून मच्छी घेणार. आणि आई खाऊ घेणार म्हणजे एकच-वडापाव किवा चुरमुरयाची भेळ.

संपलं.
                                     
                                       शिवाय घरी येताना माझ्या सुद्धा हातात एक-दोन जड पिशव्या देणार आणि रिक्षाने न आणता चालतच घरी आणणार. म्हणूनच आईसोबत बाजारात जायचं म्हणजे कंटाळा गुणिले कंटाळा. पण पप्पांसोबत बाजारात जायचं म्हणजे चांगली संधीचा समानार्थी शब्दच. पर्वणी!
                                        पप्पांच्या हातात हात घालून आपण उड्या मारत बिंदास चालत राहायचं. पप्पा ओरडणार तर नाहीच, उलट त्यांच्या ऑफिसमधल्या गमती-जमती सांगत बसणार. माझ्या शाळेबद्दल, वर्गातल्या मित्रांबद्दल मला विचारणार. बाजारात पोहोचल्यावर मुळीच टाईम लावणार नाहीत. कांदे-बटाटे एकदम पटापट घेणार. भाजी तर माझ्या आवडीचीच घेणार. शापु, मेथी, तोंडली, असलं काही घेणार नाहीत. मच्छीमार्केट मध्ये तर पप्पा मला नेतच नाहीत. समोरच्या हॉटेल मध्ये बसवून, मँगोला किवा थम्स-अप घेऊन देतात. आणि आपण ते पिउन संपायच्या आतच पप्पा मार्केटमधून मच्छी घेऊन येउन पुन्हा आपल्यासमोर उभे! एकदम फाष्ट्च! पण खरी मज्जा त्यानंतर येते. टोटाळे तलावाच्या बाजुलाच रस्त्याशेजारी 'महाराष्ट्र किराणा माल' हे दुकान आहे. त्या दुकानात लोकांची खुपच गर्दी असते. तिथे गेल्यावर पप्पा मला दुकानाच्या बाजूला असलेयला पायरयांवर सावलीत बसवून ठेवतात. तिथून समोरच टोटाळे तलाव दिसतं. मी मग त्याच्याकडे भरपुर वेळ पाहत बसतो. दुपारच्या उन्हात ते तलाव उघडं  पडल्यासारखं वाटतं. ओणवं उभं  राहायची शिक्षा दिलेल्या मुलासारखं बिच्चारं वाटतं. आमच्या शाळेपुढच्या तलावासारखंच हे तलाव सुद्धा चौकोनी आहे. पण खूप मोठं. ते खूप खोलही आहे, असं पप्पा सांगतात. इतकं की पप्पांच्या डोक्यावर आणखी चार माणसं एकावर एक उभी राहिली तरी सर्वात वरच्या माणसाच्या नाकापर्यंत पाणी येईल. तलावाच्या ज्या चौथ्या बाजुला बाजार भरत नाही, तिथे बऱ्यापैकी सावली आहे. नारळाची छानशी झाडं  आहेत. तलावात उतरणाऱ्या लांबच्या लांब दगडी पायऱ्या सुद्धा आहेत. त्या बाजूला जायला मला कधीच मिळालं नव्हतं.

                                        आमच्या शाळेजवळच्या छोट्या तलावात कधी कधी तीन-चार काळीकुट्टं माणसं,  डोक्यावर मोठ्ठाल्या टोपल्या घेऊन येतात. त्या टोपल्यांमध्ये पालेभाजी आणि मूळ्याची भाजी असते. ते लोक ती भाजी तलावाच्या पाण्याने धुतात. त्यानंतर त्याच पाण्याने अंघोळ करतात आणि शेवटी कपडे पण तिथेच धुतात. त्यावेळी तलावाच्या पाण्यावर मस्तपैकी छोट्या छोट्या लाटा तयार होतात. फेसमहाराज त्या लाटांवरून डुलत डुलत ऐटीत तलावाच्या दुसऱ्या काठापर्यंत जातात. कधी कधी खूप साऱ्या  काळ्याकुट्टं म्हशींची टीम तलावाच्या पाण्यात उतरते. त्या म्हशी बुद्धुसारख्या पाण्यात बसूनच राहतात. आम्हाला  गेल्याच महिन्यात  सामान्य विज्ञानाच्या पुस्तकातला जलप्रदूषणाचा धडा बाईंनी शिकवला. त्यामुळे तलावाचं  पाणी प्रदूषणयुक्तच  असणार, हे आम्हाला चांगलंच  माहित होतं. पण दरवर्षी तलावात गणपती विसर्जन होतं. आणि विसर्जन झाल्यावर तलावाचं पाणी पुन्हा शुद्ध होतं, असं आमच्या वर्गातली किर्ती किणी सगळ्यांना सांगत असते. किर्ती म्हणजे काय दरवर्षी पैकीच्या पैकी मार्क.  'चिव चिव तेजश्री' नंतर दुसरा-तिसरा तरी नंबर तिचा असणारच. त्यामुळे तिचं बोलणं काय खोटं नसणार, असं बाली मला नेहमीच  सांगतो. पण तरीसुद्धा आमच्या तलावात पाण्याखाली खूप भुतं-बितं असल्याचं आई आणि आत्या मला नेहमी सांगत असते. तलावात दरवर्षी एक-दोन  माणसं तरी बुडून मरतात. मग त्या मेलेल्या माणसांची भुतं होतात. ती भुतं खोल पाण्याखाली लपून बसलेली असतात. आपण तलावाच्या काठाशी एकदम जवळ गेलो, तर ती पटकन आपल्याला खेचून पाण्याखाली नेतात आणि बुडवून मारून टाकतात? नंदीआत्यानं झोपताना असलं काही सांगितलं की आम्ही गारच! मग गोधडी अंगावर घेतली की गुदमरायलाच व्हायला पाहिजे. आपण तलावाच्या हिरव्या-काळ्या पाण्याखाली बुडत चाललोय असंच वाटत राहणार आणि सकाळी उठून पाहिलं की खरोखरंच गोधडी ओली!

                                     
                                        आमच्या तलावाच्या अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या. पण टोटाळे तलावाच्या अशा काहीच गोष्टी मला माहित नव्हत्या. शंतनू, धीरज, जितेश पवार, विश्वास परुळेकर, प्रथमेश खानोलकर, दिपिंती सकपाळ, मधुरा आणि बरीचशी मुलं-मुली पूर्वेला राहतात. पण त्यांच्यापैकी कुणालाही त्या तलावाबद्दल विचारलं की, " त्यात काय एवढं? आहे मोठ्ठ तळं. त्यात नुसतं पाणीच पाणी. काय करायचं एवढ्या पाण्याचं? ", अशा मुली बोलणार. आणि मुलाचं नेहमी एकच ठरलेलं, " ते तलाव काय कामाचं नाही. उगाचच आहे मधल्या मध्ये. त्यापेक्षा त्या जागेवर एखादं मैदान असतं तर खेळायला-बिळायला तरी झालं असतं. बेकार तलाव. "
                                       हि मुलं -मुली मला चक्रमच वाटतात. चांगलं एवढं मोठ्ठालं तलाव आहे तरी यांना त्याचं काहीच नाही. आमच्या पश्चिमेला एकच तलाव, ते पण छोटं. तरीसुद्धा आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. तलाव आमची शानच आहे. पण या पुर्वेकड्च्यांना त्यांच्या एवढ्या मोठ्ठ्या तलावाचं काहीच वाटत नाही. फक्त प्रांजली सोडून. कारण प्रांजलीला तलाव खूप आवडतो. मी कधी तिला तलावाबद्दल विचारलं, की ती पहिले दोन्ही हात तोंडावर ठेवून खो-खो हसते. तिला तसं हसताना पाहून मग मला पण वेड्यासारखं हसायला येतं. प्रांजलीसोबत बोलताना कुणीही तिच्या डोळ्यांकडेच पाहत बसणार. तिचे डोळे खूप मोठ्ठे आहेत आणि ते तलावाच्या पाण्यानेच भरल्यासारखे वाटतात.
                                   
                                     " आमचं तलाव किनई खुपच्या खूपच छान आहे. एकदम शहाण्या बाळासारखं शांत. पावसाळ्यात किनई ते एकदम काठोकाठ भरतं. आणि तुला सांगू कधी-कधी त्यात किनई पाणबगळे आणि पाण कोंबड्या सुद्धा येतात. ते उडता उडता  किनई पटकनशी पाण्यात बुडी मारतात. आपल्याला वाटतं की बाई बुडालेच ते! पण तसं नसतं काही! ती त्यांची किनई एक गम्मतच असते. मग ते गपकन पाण्याबाहेर येतात आणि तुला सांगू त्यावेळी त्यांच्या चोचीत किनई एक चंदेरी मासा असतो. ते त्याला तसेच खातात आणि पाण्यावर किनई बोटीसारखे तरंगत राहतात. आणि तुला सांगू पौर्णिमेच्या रात्री किनई चंद्र तलावाच्या पाण्यात उतरतो. त्याला पाहून नमस्कार केला, की पाठ केलेलं सगळं लक्षात राहतं असे माझे आजुबाबा सांगतात. आणि तुला सांगु सर्वात जास्त मज्जा किनई संध्याकाळी असते. तेव्हा लालेलाल सूर्य किनई हळू-हळूच पश्चिम दिशेला उतरत असतो. तेव्हा आपण तलावाच्या दगडी पायऱ्या आहेत किनई तिकडे जाऊन बसायचं. मग सूर्यदेव बरोब्बर आपल्या समोर! तेव्हा  किनई एक मोठी जादूच होते! तलावाच्या पाण्यावर वाऱ्यामुळे किनई छोटया छोटया लाटा पळत असतात. आणि तुला सांगू सूर्याची सोनेरी सोनेरी किरणं त्या लाटांवर पडतात आणि मग तलावाचं सगळं पाणीच सोनेरी सोनेरी दिसतं. त्या सोनेरी लाटा पाहायला आमचे आजुबाबा किनई मला दर शनिवारी आणि रविवारी त्या दगडी पायऱ्यांजवळ नेतात आणि तुला सांगू……  "

                                      प्रांजली सोबत बोलायचं म्हणजे मधली सुट्टी छोटीच वाटणार. तिचं बोलणं म्हणजे त्या रेल्वेच्या रुळांसारखंच. स्टेशन मधून निघाले की बेटे गेलेच लांबच्या लांब. कुठे संपायचं नावच  नाही. पण तरीसुद्धा मला प्रांजलीचं बोलणं खूप मस्त वाटतं. त्यात ती 'किनई' हा शब्द तर भरपूरच वेळा बोलते. प्रत्येक वाक्यामध्ये एकदा तरी किनई असणारच. वर्गातली मुलं -मुली सुद्धा तिला 'किनई'च बोलतात. " अगं किनई,  आम्ही सगळ्या किनई कधीच्या डबा उघडून बसलोय किनई, ये किनई डबा खायला.  नाहीतर किनई बेलच किनई होणारssss. असलं कायतरी मुली तिला बोलणार. पण 'किनई'  किनई कधीच रागावणार नाही. उलट दोन्ही हात तोंडावर ठेऊन खो-खो हसणार. मी मात्र तिला नेहमी प्रांजलीच म्हणतो. कारण नंबर एक-तिचं नाव खूपच छान आणि वेगळं असल्याचं पप्पांनी मला सांगितलंय आणि कारण नंबर दोन म्हणजे, तिच्याशी कधी पण  बोलायला जा ती नीट बोलणार आणि भरपूर बोलणार.
                                     आमच्या वर्गात एकूण तीन प्रकारच्या मुली आहेत. प्रकार नंबर एकच्या मुली एकदम भांडखोर आणि चिडक्या. खेळताना हज्जार वेळा चिडाचिडी करणार. पुन्हा नखं-बिखं मारायलाही अंगावर धावत येणार. प्रकार नंबर दोनच्या मुली म्हणजे एकदम शांत. कधीच कुण्णाशीच जास्त बोलणार नाहीत. मुलांशी तर नाहीच नाही. त्यांना कुणी काय बोललं किवा चिडवलं तर लगेच जाउन बाईंना नाव सांगणार. एक नंबर चोंबड्या! प्रकार नंबर तीनच्या मुली मात्र आमच्याशी नीट बोलणार, खेळणार, भांडणारसुद्धा! पण बाईंना उगीच नावं सांगणार नाहीत. गृहपाठाची वही, गोष्टीची पुस्तकं, बाटलीतलं पाणी, खोडरब्बर, शार्पनर काही पण मागा  लगेच देणार.
                                     प्रांजली या तिसऱ्या प्रकारातली होती.






                                                                                                      … उर्वरित गोष्ट पुढच्या भागात






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा